Tuesday, 9 May 2023

वर्चस्वाची लढाई राजीनामा नाट्यातून

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. श्री शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात आणि देशभरात जणूकाही भूकंप झाला अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र खा. शरद पवारांनी याहीपेक्षा काहीतरी वेगळं घडवून आणण्यासाठी तर हा राजीनामा दिला नाही ना ही शंका सहजच मनाला चाटून जाते. कारण शरद पवार यांनी आतापर्यंत केलेल्या कोणत्याही गोष्टींच्या पाठीमागं निश्चितपणे काहीतरी व्यापक स्वरूपातला विचार असतो. म्हणून राजीनामा नाट्या बाबतीत, हो याला नाट्यच म्हणावं लागेल. कारण नंतर कार्यकर्ते आणि नेत्यांच्या दबावाला बळी पडून राजीनामा मागे घेत अध्यक्षस्थानी विराजमान झाले. या राजीनामाला अनेक कंगोरे दिसून येतात. एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचे कसंब असणार्‍या मा. खा. श्री शरद पवारांनी यावेळी देखील एकाच झटक्यात अनेकांना गारद केले आहे आणि पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आपणच आहोत हे दाखवून देण्यात ते यशस्वी ठरले. 
एकीकडे या राजीनामा नाट्याला जी अनेक कंगोरे आहेत त्यात मा. आ. अजित पवार  बीजेपीच्या वाटेवर ही टॅगलाईन मागच्या काही दिवसापासून माध्यमांच्या केंद्रस्थानी होती. तर राज्य सरकारने  सातत्याने  राष्ट्रवादीवर कुरगुडी करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे आपल्याकडे सगळ्यांच्या नजरा वळवण्यासाठी  हा अचानक घडवून आणलेला भूकंप होता. त्यामुळे अजित पवारांचा भाजप रस्ता आपोआपच बंद झाला. 
 दुसरीकडे राष्ट्रीय राजकारणात बिहारमध्ये भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार यांचा घटस्फोट झाल्यानंतर देशपातळीवर काही वेगळ्याच हालचाली पाहायला मिळत होत्या. नितीश  कुमार यांनी लालू यादव यांचे चिरंजीव आणि मुलायम सिंग यांचे चिरंजीवांना हाताशी धरून राष्ट्रीय राजकारणात आपला जम बसवण्याच्या हालचाली सुरू केल्या. दरम्यान त्यांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या अध्यक्षांशी घेतलेल्या भेटीने सहाजिकच शरद पवार यांना राष्ट्रीय राजकारणातून आपण बाहेर फेकले जातोय की काय असे वाटत असावे. कारण जोपर्यंत भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार यांचे सरकार बिहारमध्ये होतं तोपर्यंत विरोधकांचे नेते म्हणून शरद पवार हे अग्रभागी होते. बिहार मधली सत्ता समीकरणे बदलली आणि नितीश कुमार उघडपणे विरोधकांच्या तंबूतील मुख्य आधारस्तंभ बनले. शिवाय त्यांनी ताबडतोब राष्ट्रीय पातळीवर भारतीय जनता पार्टीला सक्षम विरोधक म्हणून नेतृत्व देण्याच्या हालचाली सुरू केल्या. यातूनच शरद पवार यांना राष्ट्रीय राजकारणात नितेश कुमार यांच्या आगमनानंतर आपला फारसा प्रभाव पडत नसल्याचं दिसून येत होतं होतं म्हणून त्यांनी राजीनामा नाट्य घडून राष्ट्रीय पातळीवरील विरोधकांना आपणच पक्षाचा अध्यक्ष राहावा अशी मनधरणी करायला भाग पाडले. म्हणूनच शरद पवारांनी आपल्या राजीनामा नाट्यातून आपलं वर्चस्व पुन्हा कायम राखण्याची किमया साधली आहे. 

Thursday, 13 April 2023

व्यथा वेदनांच्या

जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलाचा फटका सर्वाधिक कोणत्या क्षेत्रावर होत असेल तर तो शेती क्षेत्रावर होत आहे. त्यामुळे या क्षेत्रावर होणारे नैसर्गिक  रूपातील अवकाळी चे हल्ले असतील, गारपीट, किंवा अतिवृष्टी अशा एक ना दोन असंख्य  सातत्यपूर्ण येणाऱ्या संकटामुळे शेतकऱ्यांच्या वेदना तीव्र होत असून, त्यांच्या व्यथा कोणाकोणापुढे मांडायच्या आणि आपला फाटका संसार नेताना  नेटाने रेटत राहायचं, हा शेतकऱ्यांचा दुःखदायी प्रश्न होय. 
    जागतिकीकरण भांडवल आणि खाजगीकरण या गोंडस नावाखाली शेतकऱ्यांची पारंपारिक जीवनशैली बदलून त्या ठिकाणी भांडवल प्रधान व्यवस्था अस्तित्वात आणल्याचा परिणाम, शून्य भांडवल आधारित पारंपारिक शेतीच कंबर्ड मोडलं, परिणामी शेतकऱ्याला एकीकडे भांडवलशाही शेतीच आकर्षण आणि दुसरीकडे पारंपारिक शेतीतून मुक्त झालेला असुरी आनंद फार काळ टिकणारा नाही हे आता लक्षात येत आहे. कारण भांडवलशाही पद्धतीत गुंतवलेल्या भांडवलाच्या प्रमाणात भारतीय शेतीतील उत्पादकता उत्पन्न देत नाहीये. परिणामी बुडते भांडवल हा भारतीय शेतीचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या जीवावर उठून त्याला आत्महत्येस प्रवर्त करत आहे. पारंपरिक शेती पद्धतीमध्ये असणार स्वावलंबनाचे तंत्र आता पूर्णपणे भांडवलशाही पद्धतीमुळे अर्थ तत्त्वावर आधारित असल्याने प्रत्येक लहान कामासाठी त्याला पैसे मोजावे लागतात. या सर्वांचा एकंदरीत परिणाम त्याने आपल्या हक्काच्या परंपरा ज्या कसल्याही भांडवलाच्या आवश्यकते शिवाय चालत होत्या त्या मोडीत काढून स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतल्याचे दिसून येतं.