नाटकातील छोट्या छोट्या घटना आणि प्रसंगावरून कवी शरद हा चित्रविचित्र अवस्थेत सापडून पत्नीच्या मानसिक छळवादाला कंटाळून कुठेतरी स्वप्नांच्या दुनियेत हरवून ते कधीही न मिळालेले प्रेम शुभ्राच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न करतो. त्याचा हा प्रयत्न ताराच्या नकारात्मक वर्तनाच्या अनुषंगाने त्याच्या आंतरपटलावर निर्माण झालेला असतो.
अंतर्मनावर बिंबलेली कवी मनाची भावनिकता ताराच्या अंगी लवलेशही दिसून येत नाही. उलट भोळ्या शरदला ताराच हे वर्तन शुभ्राच्या अधिकाधिक जवळ घेऊन जाण्यासाठी कारणीभूत ठरतं. दुसरीकडे शुभ्राला शरदच्या कविता अत्याधिक आवडतात आणि ती त्याला अधिकाधिक कविता लिहिण्याला प्रेरित करते. दोन व्यक्ती रेखांमध्ये एक शरदच्या कविता बनून कवितेत उतरते तर दुसरी तारा कवितेचा दुष्वास करते,शरदच्या कविता फाडून टाकते. ताराच हे वर्तन शरदच्या अंतर्मनाला चिरफाटून टाकतं तो अंतर्मनातून हेलावून जातो आणि जिला शुभ्रा समजून विवाहपूर्वी प्रेम करत होता तोच विवाह नंतर ताराचा तो प्रचंड तिरस्कार करू लागतो. ताराचा तिरस्कार करताना तो शुभ्राच्या प्रेमात पडला आणि शेवटी शुभ्रा शिवाय त्याची कविता आणि त्याचे जीवन अधुरं वाटू लागलं.
त्याच्या या अशा वागण्याचा ताराच्या मनावर परिणाम झाला आणि ती या बदला संदर्भात गंभीर विचार करते. या दोघांच्या संसारामध्ये असणारा तिसरा घटक सायक्राॅटिस्ट ताराला आणि शरदला त्यांच्यात निर्माण होणाऱ्या दुराव्याबद्दल वेळोवेळी सतर्कतेचा इशारा देतो. मात्र दोघेही आपापल्या बाजूने योग्य असल्याचं भासवतात. तरीदेखील या ठिकाणी एक गोष्ट कायम लक्षात घ्यावी लागते ती म्हणजे पती-पत्नीमध्ये होणारी भांडणं ही जर अल्पकालीन असतील तर आपल्याला या नाटकाचा शेवट वेगळा पाहायला मिळाला असता परंतु शरदच्या मनात आपल्याविषयी प्रेमळ भावना निर्माण व्हाव्यात यासाठी शुभ्रा बनणारी तारा शेवटी स्वतःला संपवून शुभ्रा म्हणून राहण्यासाठी सुद्धा तयार होते. मात्र ताराच्या मनात असलेली पांढऱपेशी समाजातले हव्यास शुभ्रा बनली तरी गेलेले नसतात. इथेच तिची चूक होते आणि शरद शेवटी ताराला संपवतो. आणि शुभ्राच्या मिठीत बेधुंद कविता करत राहतो.
या नाटकाच्या माध्यमातून लेखक आणि दिग्दर्शकांनी आधुनिक काळातील कुटुंब व्यवस्थेत टोकाच्या भूमिकेतून ज्या समस्या आणि प्रश्नांचा डोंगर समाजापुढे उभा राहतोय त्याची झलक दाखवण्यात यशस्वी झालेले आहेत. नाटकात इनमिन चार पात्र परंतु चारही पात्र तेवढ्याच तोलामोलाची तेवढ्याच समर्थपणे आणि एकमेकांच्या पात्राला अधिकाधिक खुलवणारी दिसून येतात. शुभ्रा ही कल्पना अर्थात भासमानच आहे.
तारा हे वास्तव आहे. सुरुवातीला कठोर व व्यावहारीक असलेल्या ताराला, शरद मनोरुग्ण झाल्यानंतर व जयंत ने जाणवून दिल्यानंतर त्याचं प्रेम समजतं. तिचंही शरदवर प्रेम आहेच. मात्र व्यावहारीक अपेक्षांच्या ओझ्याखाली ते लपलेलं होतं. एका भावनिक क्षणी तिला स्वतःचीच घृणा येते. ती शरदला ते बोलून दाखवते. मात्र शरदच्या मनःपटलावरुन तारा कधीच गायब झालेली असते. तिची साधी आठवण सुद्धा त्याला अस्वस्थ करुन जाते.हीच गोष्ट भावनेच्या भरात तारा विसरते आणि ती शरदला मी तारा असल्याचं सांगते. इथेच ताराचा घात होतो. आणि ताराला शरद संपवतो.
केवळ दोन अंकात नाटक संपत परंतु बदललेल्या स्थितीच भान मात्र रसिकांच्या मनात खोलवर बिंबवतं.
शुभ्राच अस्तित्व हे जरी भासमान असलं तरी ताराच्या टोकाच्या भूमिकेमुळे ते वास्तववादी दिसतं म्हणून तारा स्वतःचा अस्तित्व संपवून शरदच्या जीवनात पुन्हा स्थान मिळवण्याचा प्रयत्न करते परंतु त्यासाठी बराच वेळ गेलेला असतो म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय हे महत्त्वाचे ठरतात.
लेखक दिग्दर्शक :अॅड शैलेश गोजमुंडे
प्रकाश योजना: सुधीर राजहंस
नेपथ्य :अॅड बालाजी मेहेत्रे निशिकांत जोशी
संगीत :तनमय रोडगे विनायक राठोड निलेश पाठक रंगभूषा /वेशभूषा :सचिन उपाध्ये स्मिता उपाध्ये आणि कलाकार :प्रा. नवलाजी जाधव डॉ. स्वप्नाजा यादव, अभिषेक शिंदे, प्रज्ञा मुळे, पृथ्वी सिंह चव्हाण, आलोक वलाकट्टे आणि अड शैलेश गोजमगुंडे.
No comments:
Post a Comment