जेव्हा- जेव्हा समाजात सामान्यांचे जगणं असहाय्य होऊन बसते अशा वेळेला त्या- त्या कालखंडात बुरसटलेल्या विचारसरणीला छेद देण्याचे त्या त्या कालखंडात प्रयत्न केले आहेत. तसाच प्रयत्न समाजातल्या अनिष्ट प्रथांना फाटा देऊन सामान्यांचा जगणं सुसहाय्य करण्याचा प्रयत्न आणि समाजातील अर्ध्या घटकाला महिलांना समान हक्क प्रदान करण्याचा विचार देऊन परिवर्तनवादी विचार समाजाला प्रदान केले. समाजात एक नव प्रवाह यानिमित्ताने सुरू झाला. भारताची संस्कृती वैभवशाली परंपरेच्या अनुषंगाने महत्त्वाची आहे, पण त्यात वेळप्रसंगी काही चुकीच्या गोष्टींना देखील दूर सारण्याचा त्या त्या कालखंडात झालेला प्रयत्न हा खूपच महत्त्वाचा वाटतो. म्हणून समाज जीवनामध्ये परिवर्तन येत असतात आणि ही परिवर्तने समाजाला निश्चितपणे विकासात्मक दिशेनं घेऊन जाणारी असली तर त्या समाजाचा पाया आणि वैचारिक प्रगल्भता ही साहजिकच इतरांच्या तुलनेत अधिक प्रभावी वाटते. महात्मा बसवेश्वरांनी केलेल्या सामाजिक जाणीवा, प्रयत्नांचा आलेख हा सर्वच बाबतीत चढत गेलेला दिसतो. शोषण विरोधी, भेदभाव विरोधी, जातीभेद विरोधी मांडलेले विचार आजही आम्हाला समाजात तितकेच प्रासंगिक वाटतात. कारण समाजात आजही हे प्रश्न आम्हाला अनुभवायला येतात. त्यांच्या तो त्या कालखंडात मांडलेला विचार हा खऱ्या अर्थाने क्रांतिकारीच मानला गेला पाहिजे.
श्रमाची प्रतिष्ठा वाढवत नेऊन मानवी जीवनाचा विकास निश्चित मानला पाहिजे म्हणून
कायक वे कैलास
हा मूलमंत्र त्यांनी प्रदान केला. समाज बांधवांच्या मनात ईश्वर प्राप्तीसाठी होत असलेली पिळवणूक, श्रद्धा यांचा विचारही त्यांनी निश्चितपणे केला असावा. सर्वप्रथम चातुर्वर्ण्य व्यवसथेला कडाडून विरोध करत एक नवा समाज रचनेचा विचार महात्मा बसवेश्वरांनी मांडला. वाचोनी शेकडो वेळा,
ऐकूनही शेकडो वेळा, होणार काय
आशा सुटेना रोष जाईना,
अभिषेक करून फल काय?
बोले तैसे नाही मन असा
तो वाऱ्यांशी पाहून हसे
आमचा कुडलसंगमदेवा
महात्मा बसवेश्वर हे केवळ विचार मांडून थांबणाऱ्यांपैकी नव्हते तर त्यांनी अनेक गोष्टी प्रत्यक्ष करून दाखवल्या. ते तत्त्वज्ञ तर होतेच पण कृतिशील होते तत्त्वाला, विचाराला कृतीची जोड होती. म्हणून त्यांचे विचार सामान्यांना देखील पटू लागले होते. प्रस्थापित समाज रचनेला, त्यांनी मांडलेले हे विचार साहजिकच पटणारे आणि पेलवणारे नव्हते. म्हणून सामाजिक समतेचा विचार समाजात प्रस्थापित होऊ देण्यास प्रस्थापित समाज व्यवस्थेतल्या अनेक घटकांनी विरोध केला. त्यांचा विचार हा कोणा एका व्यक्तीच्या विरोधातला नव्हता तर अनेकांनी मिळून तयार केलेल्या समाज रचनेच्या बाबतीत होता. ज्यामुळे सामान्यांचे जगणं असहाय्य बनलं होतं. समाज रुढी, प्रथा, परंपरा, बंधनं, जातीभेद, वर्णभेद सारख्या असंख्य कुप्रथामध्ये साखळदंडाने जोखडलेला होता. म्हणून त्यांनी वेगवेगळ्या मार्गाने प्रचंड माहिती आणि ज्ञान मिळवत समाजाला जो भोळा -भाबडा होता त्याला या जोखडातून सोडवण्यासाठी वैचारिक घन घातले. त्यांनी केलेल्या अध्यात्म साधनेतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळं पण प्राप्त झालं आणि ते वेगळेपण मानवतेच्या समस्त उन्नतीसाठी लोकांच्या सुखदुःखाशी समरस होत सामाजिक व्यवस्था अधिक दृढ होऊन धार्मिक, सांस्कृतिक समरसता वाढावी यासाठी प्रयत्नशील होत. स्त्री पुरुष भेदाला तर त्यांनी पहिल्या दिवसापासूनच छेद देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांनी ज्यांना ज्यांना सोबत घेतलं त्यात त्या कालखंडातल्या दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश होता. हा महात्मा बसवेश्वरांच्या कार्यात्मक भागाचा परिणाम म्हणावा लागेल. कर्मकांडात अडकलेल्या समाजाला ते म्हणत
दुग्ध हे उद्दिष्ट तथा वासराचे
पाणी ते मत्स्याचे उद्दिष्टच
पुष्प ते उद्दिष्ट तथा भ्रमराचे
साधन पूजेचे काय सांगा?
या त्यांच्या सरळ साध्या सोप्या वर्णनातून जी पूजा कर्मकांड केले जात होती ती सुद्धा शुद्ध नाहीत हा त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. पुरोहितांना आणि वर्णाश्रम व्यवस्थेचा धर्म पालन करण्यास सांगणाऱ्या व्यवस्थेचा कडाडून विरोध करण्यामध्ये बसवेश्वरांचा आग्रणी होय. माणसाला जन्माने किंवा व्यवसायाने येणारी श्रेष्ठता किंवा कनिष्ठता ही कधीही मान्य नव्हती. म्हणून त्यांनी व्यवसायावरून किंवा जन्मावरून लादली जाणारी व्यवस्था नाकारून अर्थात ब्राह्मण्य व्यवस्थेला नाकारून या सर्व ब्राह्मण्यवस्थेने नाकारलेल्या समाजातील विविध घटकांची मोट बांधून एकत्र करण्याचा प्रयत्न केला. या सर्वांना साध्या सरळ सोप्या भक्तिमार्गाने मोक्ष प्राप्तीचा मार्ग सांगितला. तसे पाहता महात्मा बसवेश्वरांचे विचार हे आधुनिक भारताच्या उभारणीसाठी 12 व्या शतकात केलेली पायाभरणीच म्हणावी लागेल. त्याच दृष्टीने भारतीय राज्यघटनेत असलेल्या मानवाधिकाराच्या बाबी या महात्मा बसवेश्वरांनी मांडलेल्या अनेक वचनातून आपल्याला अनुभवता येते. कायक वे कैलास या संकल्पनेतून कोणत्याही व्यक्तीच्या कर्माला कमी जास्त लेखता येत नाही हा विचार मूळ लोकशाही तत्त्वांशी सुसंगत असल्याने तो आम्हाला अधिक भावतो. त्यांचे हे तत्व वैश्विक मानव जातीच्या उत्थानासाठी देखील लागू पडते. महात्मा बसवंनांनी व्यवस्था परिवर्तन घडवून आणण्याचा ऑटोकाट प्रयत्न केला. एकांताकडून लोकांताकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे, बहुदेव तत्वाकडून एकेश्वर वादाकडे जाणारे आहेत. ऐतखाऊ वृत्ती कडून कायकवादाकडे, विषमतेकडून समानतेकडे, शिवलिंगाकडून इस्टलिंगाकडे अशा पद्धतीने त्यांनी समाज रचनेची दिशा ठरवली होती. त्यांचा हा विचार बाराव्या शतकातल्या तत्कालीन समाज व्यवस्थेला मान्य होणे कदापि शक्य नव्हते. ते धर्मचिंतक तर होतेच परंतु त्याच बरोबर सामाजिक सुधारणांचे प्रणेते होते असं देखील आपल्याला म्हणावं लागेल.
दगडाचा देव देव नव्हे
मातीचा देव नव्हे
वृक्षदेव देव नव्हे
देव तुमच्या अंतर्यामी
हे कुडलसंगम देवा
म्हणजेच समाजाला प्रतिकात्मक पूजा, संस्कृती, संस्कार यासारख्या गोष्टींमध्ये अडकून ठेवण्यामध्ये जे स्वतःला धन्य मानत त्याच्यावर बसवन्नाने प्रचंड प्रहार केला. महात्मा बसवेश्वरांच्या कार्याचा इतिहास तसा खूप मोठा व्यापक विस्तृत असून त्यांच्या वचनांच्या माध्यमातून देशभरात मोठ्या क्रांतिकारी विचाराची ठिणगी पडली.ही ठिणगी पुढे धगधगत्या मशालीत रुपांतरीत होऊन समाज व्यवस्थेत धर्म जाती विरहित आणि कर्मकांड रहित विचाराला चालना मिळू लागले. हीच बाब आजही आमच्या प्रगत समाजाला तेवढीच लागू पडते जेवढी ती बाराव्या शतकात लागू पडत होती. आज आम्ही कितीही उच्च विद्या विभूषित झालो तरी महिलांच्या बाबतीत सन्मानाचे स्थान अजूनही घराघरातून प्राप्त होणे बाकी आहे. त्यासाठी आम्हाला कितीतरी कायदे नियम करावे लागतात. परंतु आम्ही त्याचं पालन करत नाही. महिलांच्या बाबतीत होणारे अत्याचार, अणाचार, दुराचार थांबवायचे असतील तर महिलांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान देण्याची मानसिकता विकसित करू शकलो तर ते खऱ्या अर्थाने महात्मा बसवेश्वर यांना जन्मदिनाची अपूर्व भेट मानावे लागेल.
डॉ वनिता आग्रे पटवारी
दयानंद कला महाविद्यालय, लातूर
No comments:
Post a Comment