निकाल घोषित झाला निकालानंतर जो तो आप-आपल्या परीने आनंद व्यक्त करतोय. पण एक महत्त्वाची बाब म्हणजे ईव्हीएम यंत्राबाबत कोणत्याही राजकीय पक्षाने आपली तक्रार केली नाही. ही बाब निवडणूक आयोग आणि त्या यंत्राच्या विश्वासार्हतेवर शिक्कामोर्तब करणारी ठरते. त्यामुळे इथून पुढे आपल्या पराभवाचे ईव्हीएमवर कोणीही खापर फोडणार नाही ही एक जमेची बाजू या निवडणुकीतून आपल्याला पाहायला मिळते.
निवडणुकीच्या निकालानंतर ज्या काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात त्यात नरेंद्र मोदींचा पराभव, नरेंद्र मोदींच्या विचारांचा पराभव, नरेंद्र मोदीच्या हुकूमशाही विचाराला लगाम अशा प्रकारची वक्तव्य एकीकडे तर दुसरीकडे काँग्रेस भक्कम स्थितीत पोहोचली, समाजवादी पक्षाने आपले अस्तित्व निर्माण केले, चंद्रबाबू नायडू ने पुन्हा फिनिक्स प्रमाणे झेप घेतली, भारतीय जनता पक्षाने दक्षिणेत आपले झेंडे रोवले, ममता बॅनर्जी ने पुन्हा पश्चिम बंगाल वरचे आपले वर्चस्व दाखवून दिले, तर उत्तर प्रदेशने त्यातल्या त्यात आयोध्या नगरीने आणि परिसराने भाजपला रामाच्या नावानेच नाकारले गेल्याच्या चर्चा सर्वत्रच ऐकायला मिळत आहेत.
महाराष्ट्रातलं राजकारण तर पूर्णपणे ढवळून निघाल आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभेच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षापासून सुरू असलेल्या रणसंग्राम महाराष्ट्रातल्या राजकारणाला विटाळ लावणारा ठरला होता. दोन राजकीय पक्ष फोडणे आणि प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्यांना आपल्या पक्षात घेणे, बरोबरीने ठेवणे हे किती महागात पडू शकतं हा देखील या निवडणुकीच्या निकालाचा अर्थ आपण लावू शकतो आणि म्हणून भावना, विचार, पक्ष या गोष्टी प्रसंगाप्रमाणे मतदारावर लागू पडतात. महाराष्ट्रातच नाहीतरी संपूर्ण भारतात बंडखोरी यापूर्वी देखील झालेली आहे मात्र त्याचे परिणाम त्या त्या वेळेला दिसून आले. नंतर मात्र सर्व काही सुरळीत असे चित्र पाहायला मिळत. पण महाराष्ट्रातल्या राजकारणात हे चित्र पूर्णपणे विस्कटून गेलेले पाहायला मिळते म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणाला भविष्यात या निकालामुळे कलाटणी मिळण्याची शकण्याची शक्यता आहे
या निकालाचा दुसरा अन्वयार्थ देशातल्या लोकशाही व्यवस्थेतील विरोधी पक्षाला असलेली महत्त्वाची भूमिका. मागच्या दहा वर्षात देशात कणखर नेतृत्व असणारा विरोधी पक्षच अस्तित्वात नव्हता. त्यामुळे मोदी हुकुमशासारखं वागत असल्याची भावना सर्वसामान्यांच्या मनामध्ये सुद्धा निर्माण झालेली होती. परिणामी मोदींना मतदारांनी धडा शिकवला अशी भाषा विरोधक करू लागले आहेत. याचा विचार करता मतदारांनी 55% म्हणजेच 240 जागेवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून दिल्याने मोदींच्या ध्येय धोरणाला, कार्यक्रमाला केवळ 50% लोकांचा पाठिंबा असल्याचा अर्थ देखील आपणास काढता येऊ शकतो. नरेंद्र मोदींना 3.0 मधील आपल्या सरकारचं अस्तित्व पुन्हा एकदा नव्याने एनडीए च्या सहकार्यांसोबत चालवावं लागणार आहे. त्यामुळे एक मुखी निर्णय, एक मुखी अंमलबजावणी या धोरणाला आता खीळ बसणार आहे. त्याची सुरुवात बिहार मधील जनता दलाच्या वतीने केलेल्या वेगवेगळ्या निर्णयांच्या बाबतीत पुनर्विचार करण्याची शक्यता असल्याचे प्रतिपादन करून केली आहे. तर दुसरीकडे चंद्रबाबू नायडू यांनी वेगवेगळी महत्त्वाचे खाते मागून भारतीय जनता पार्टीचे तिसऱ्या टप्प्यातील सरकार हे काटेरी वाटेवर चालणारे आणि दोरीवरची कसरत करणारे ठरणार यात शंका नाही. त्यामुळेच काँग्रेसचे मलिकार्जुन खरगे यांनी आज आम्ही घाई गडबड न करता योग्य संधी आणि वेळेची वाट पाहू आणि सत्ता स्थापनेचा दावा करू हे केलेले विधान म्हणजेच भविष्यात एनडीए मध्ये निर्णयाच्या, अंमलबजावणीच्या वरून मतभेद निर्माण होऊ शकतात आणि त्यांचा पाठिंबा आपल्याला मिळू शकतो हा आशावाद खरा की खोटा ठरणार हे भविष्यात कळू शकेल.
निवडणुकीतून चांगले, वाईट, सुशिक्षित, महिला आणि त्याचबरोबर देशद्रोहाचा आरोप असणाऱ्या दोघांना संसदेवर निवडून जाण्याचा संधी मिळाले. म्त्यामुळे निवडणुकीचा आणखीन एक अन्वयार्थ काढताना मतदाराने नेमक्या कोणत्या व्यक्तीला आपलं नेतृत्व सोपवावं याचा विचार अजूनही समाजात तितका खोलवर रुजलेला नाही हे दिसून येतं. समाजात आजही साम-दाम, दंड, भेद, जात, धर्म, पंथ, भाषा याचा आधार निवडणुकांमध्ये घेतला जातो आणि त्यातून कुरघोडी करण्याचे प्रयत्न होतात नव्हे त्याचीच समीकरणे बसवण्याचा प्रयत्न होतो. हे देखील महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या आणि अनेक मतदारसंघातील निकालांनी सुद्धा दाखवून दिलेल आहे. जातीची समीकरण, राज्यातील आंदोलने, शेतकऱ्यांचे कांदा, सोयाबीन नुकसान भरपाई, पिक विमा सारखे प्रश्न राज्यात होत असलेल्या विविध आरक्षण समर्थनातील आंदोलने यांचाही या निवडणुकीवर प्रचंड प्रभाव पडलेला दिसतो. म्हणून निकालाने आम्हाला हा देखील विचार करायला भाग पडले आहे. म्हणून निकालानंतर प्रत्येक जण आनंदी असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. असं क्वचित वेळा घडतं आणि हे 2024 च्या निवडणुकांनी आपल्याला दाखवून दिलं कितीही आरोप प्रत्यारोप झाले, कितीही विकासात्मक योजना राबवल्या तरी अनेक गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून निकालाकडे पाहणं हे अत्यावश्यक ठरतं. 2024 चा निकाल केवळ भारतीय जनता पार्टीला दिलेला धक्का नसून तो त्यांच्यासोबत असणाऱ्या घटक पक्षांना देखील तो देण्यात आलेला आहे. इंडिया आघाडीने केवळ मोदी विरोध न करता काही स्थानिक व विकासात्मक मुद्दे घेऊन या निवडणुकीत आपला फोकस केलेला असल्यामुळे त्यांना हे यश संपादन करता आले. देशातल्या प्रत्येकालाच निवडणूक निकालाचे वेगवेगळे पैलू पाहता येऊ शकतात
प्रा पटवारी शिवशंकर लातूर
मुक्त पत्रकार